रसग्रहण (हायकू)
मी तिच्यासह-
क्षितिजावर शांत,
रम्य एकांत.
डॉ. सुधीर काटे.
फक्त सहा शब्दांची, तीनच ओळींची छोटीशी हायकू. एका हळव्या कवीची तितकीच हळवी कविता.
वरवर पहाता, रम्य एकांतात शांत बसलेली प्रेमिकांची एक छानशी जोडी आपल्याला दिसते.
पण 'क्षितिजावर ' या शब्दापाशी आपण जर अडखळलो, तर संपूर्ण कविता एकदम झळाळून उठते. विजेसारखी चमकून जाते.
असं काय आहे या एकाच शब्दात ?
क्षितिज-
सागरकिनारी , नदीतिरी, तरुतळी, डोंगरकड्यावर, अशा निसर्गरम्य ठिकाणांवर प्रेमीजन एकांत मिळविण्यासाठी जातात. तिथे निवांत, शांत बसून दूरवर क्षितिज पहात असतात. त्यांना क्षितिज दूरवर दिसत असते.
कवीचा हा एकांत मात्र थेट क्षितिजावरच आहे. त्यामुळे क्षितिज दूर न रहाता, कवितेने आणि कवीने एकदम उंची गाठलीय, थेट अवकाशाची.
क्षितिजावर कोण असतं ?
क्षितिजावर कोण दिसतं ?
क्षितिजावर कोण भेटतं?
चंद्र, सूर्य, तारे, संध्या, उषा.....
निसर्गनाट्यातली ही पात्रं .
चंद्र आणि सूर्य, उगवताना आणि मावळतानाच फक्त क्षितिजावर दिसतात. यावेळी त्यांचे रूप रम्य, सौम्य, स्नेहल, आरक्त असे असते.
ही आरक्ती अनुरक्ती आहे. एकांतातला हा अनुराग आहे.
तिच्यासह-
चंद्र रोहिणीसह, सूर्य संध्येसह, तसेच सूर्य उषेसह. अशा या जोड्या.
एकांत-
इतर सर्वांपासून दूर, म्हणजे एकांत . इथे तर पृथ्वीपासून दूरचा हा एकांत दिसतो. किती दूर ?
आंतर प्रकाशवर्षात मोजण्याइतके. कुठल्या उपद्रवाचा संभवच नाही. हा खरा एकांत.
शांत-
चंद्र तर शांत, शीतलतेचेच रूप. सूर्यही क्षितिजावर असण्याच्या वेळी, सकाळी आणि सायंकाळी शांतच असतो. यांच्या शांत असण्याने, बाकी आसमंतात मात्र बरेच काही सुखद घडत असते.
तो तिच्यासह एकांतात आहे, आणि दोघेही शांत आहेत, तर ही नक्कीच मीलनानंतरची तृप्त शांतता आहे.
रम्य-
सर्व उपाधींपासून दूर, फक्त आपल्या 'तिच्यासह' असल्याने, या दोघांचा एकांत रम्य असणारच.
चंद्र रोहिणी, सूर्य संध्या, तसेच सूर्य उषा या जोड्यांना क्षितिजावर साक्षी ठेवून पृथ्वीवरील जे प्रेमीजीव एकांतात भेटतात, त्या सर्वांचाही एकांत या क्षितिजवासींनी किती रम्य करून टाकलाय!
मी-
या पहिल्याच शब्दात कवीचा आत्मविश्वास दिसतो.
' मी ' च्या अस्तित्वामुळे क्षितिजावरची ही भव्य निसर्गनाट्ये घडलेली आपण पाहू शकतो. चराचराशी एकरूपता, मी आणि निसर्ग वेगळे नाही, ही भावना, ' मी ' ही व्यक्ती न रहाता एक भावना, एक काव्य बनून जाते.
केवळ ५- ७- ५ अक्षरांच्या तीन ओळींमध्ये एक नाही, दोन नाही, तर तीन तीन भव्य निसर्गचित्रे, भावनाचित्रे दाखवली.
एकांतातील भेटीसाठी क्षितिज निवडताना इथे आणखीही अर्थ असू शकेल.
इथे जगताना घडू न शकलेली भेट जगण्यानंतर तर घडत नसेल ?
असीम एकांतात, असीम शांततेत, असीम रम्यतेत!
क्षितिज हा एक भास आहे.
आकाश जमिनीला मिळाल्यासारखं दिसतं, पण प्रत्यक्षात ही भेट कधीच घडत नसते.
फक्त आभास.
तिच्यासह असलेला हा रम्य एकांत पण फक्त कल्पनेतला, आभासी तर नाही ?
सहा शब्दांच्या तीनच ओळींमध्ये एवढं ब्रह्मांड !
सलाम त्या कवीला !
***