शनिवार, ९ मार्च, २०१९

एका कोळियाने - - (पुस्तक परिचय)

लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांचे "The old man and the sea" हे गाजलेले पुस्तक. १९५२ मध्ये प्रकाशित झाले, १९५४ सालचा पुलित्झर पुरस्कारही याला मिळाला. जगातील अनेक भाषांमधे भाषांतरे झाली.
मराठीचे सौभाग्य असे, की मराठीत भाषांतर करण्यासाठी याला लाभले साक्षात् आपले पु. ल.
अगदी छोटेसे पुस्तक आहे. पण हातात घेतले , की संपवल्याशिवाय खाली ठेवलेच जात नाही, इतके जबरदस्त आहे. मूळ पुस्तक, त्याचा विषय, मांडणी आपल्याला खिळवून ठेवतेच, आणि भाषांतरकारालाही जागोजागी दाद देत आपले वाचन चालते.
भाषांतरित पुस्तकाचे नावच "म्हातारा आणि समुद्र" असे सरळ न ठेवता "एका कोळियाने" असे आहे. ही मराठीतली कविता ज्यांना माहित आहे, त्यांना पुस्तक वाचल्यावर पटेल, की याहून समर्पक नाव या कथेसाठी असूच शकत नाही.
क्यूबामधिल समुद्रावर मासेमारी करण्यात आयुष्य गेलेला एक खूप म्हातारा कोळी- सँटियागो, याची ही गोष्ट.
सलग ८४ दिवस समुद्रावर जाऊनही एकही मासा न मिळाल्याने अपयशी असा शिक्का बसलेला तो, त्याच्यावर पूर्ण विश्वास असलेला, त्याची काळजी घेणारा त्याचा मदतनिस एक लहान मुलगा. या मुलाला आई वडिलांच्या सांगण्यामुळे दुसर्या यशस्वी मासेमारांसोबत मनाविरुद्ध जावे लागते.
दुसर्या दिवशी जय्यत तयारीनिशी , आज आपली पनवती संपणारच, या विश्वासाने म्हातारा आपली होडी नेहमीपेक्षा दूरवर, खोल समुद्रात नेतो. आणि तिथे त्याचा सामना होतो मर्लिन माशाशी. म्हातार्यापेक्षा, त्याच्या शक्तीपेक्षा कितीतरी पटीने अजस्त्र असा मासा. यानंतर सुरु होते एक लढाई. म्हातार्याचा आयुष्यभराचा अनुभव, जिद्द, चिवटपणा, आणि माशाचे त्याच्याशी खेळण्यासारखे वागणे.
यात कोण जिंकतो ? कोण जिंकूनही हारतो ?  हे सगळे प्रत्यक्षच वाचण्यासारखे आहे.
समुद्रावरचे जीवन, समुद्राची अनेक रूपे, पक्षी, मासे आणि म्हातार्याचे या सर्वांशी एकरूप असणे फार सुंदर लिहिले आहे.
एक वेळ अशी येते, की तो मासा आणि म्हातारा यांच्यात भावाचे नाते म्हातार्याला वाटू लागते.
हा सगळा भागच इतक्या सहजपणे इतक्या उंचीवर नेला आहे, की वाचता वाचता आपण अवाक् होऊन जातो. जीवनाचे एक गूढ तत्वज्ञान अचानकपणे आणि तितक्याच सहज, सोपेपणाने सामोरे येते.
मूळ पुस्तकातील रेखाटने (sketches) या पुस्तकात जशीच्या तशी घेतली आहेत, आणि ही चित्रे पण पुन्हा पुन्हा पहात रहावी अशी आहेत. (मुखपृष्ठावरुन थोडीशी कल्पना येईल.) हा एक या पुस्तकाचा plus point आहे.
पद्मश्री पु. ल. देशपांडे भाषांतरकाराच्या भूमिकेतही आपली मने जिंकून जातात. नेहमीसारखीच.

गुरुवार, ७ मार्च, २०१९

एक दिवस. . .

अंधाराचे मखमली पांघरूण अलगद दूर करत दिवस नुकताच कूस बदलत होता. एक अलवार निरागस शांतता आसमंतात काठोकाठ भरून राहिली होती. रात्रीच्या वाडग्यात पडलेले नक्षत्रांचे दान कधीचे झिरपून गेले होते.

 एक पक्षी प्रसन्नपणे किलबिललाआणि भाग्यवान ललाटावर नियतीची अक्षरे उमटावीत, तशी एक नवी कोरी ताजी पहाट हळूहळू क्षितिजावर उमटू लागली.

 ***
सकाळ होत गेली. दिवस उगवत गेला. दिवसाचं हे बाळरूप अपार उत्सुकतेने जग जाणून घेऊ लागलं. जिवाशिवाची जोडी होती, तोवर सगळा आनंदच भरून राहिला होता. मग त्याला "मी" आणि बाकीचं सगळं, असं पण कळू लागलं. एक एक नवीन अनुभव पोतडीत जमा होऊ लागला. आता दुःखाचीही अधूनमधून हजेरी लागू लागली.  
सुखदुःखाची आंबटगोड चव घेत दिवस रुळू लागला होता. कसल्याशा लगबगीने उबदार सकाळ पुढे चालू लगली. दुपारची लख्ख उन्हे तिला साद घालीत होती. 
पण सकाळ सरता सरता काही वेगळंच घडू लागलं. काहीतरी भव्यदिव्य करण्यासाठी मन आणि शरीर अधीर होऊ लागलं. बालपणाचं कोवळं बंधन आता रुचेनासं झालं होतं. अन् मग अशातच तारुण्याचा मेघ गर्जत बरसत आला. नवरसांच्या वर्षावाची मग सवय होऊ लागली. तनमन हिरवंगार घेऊनच दिवसाने दुपारच्या दालनात प्रवेश केला. 
***
इथं सूर्य झगमगत होता. अंगात भरपूर जोम होता. कर्तृत्वाला अथांग आकाश मोकळं होतं. उत्साह उतू जाऊ लागला.साथीसोबती मिळू लागले. सप्तरंगी स्वप्नांचा रथ सत्याच्याही मार्गावर विहरू लागला.
 दुपार आणखी थोडी मार्गस्थ झाली, अन् दिवसाला भान आले. डोक्यावरचा सूर्य परिस्थितीचे चटके देऊ लागला. तरीही समोर येणार्या सगळ्या जबाबदार्या, सगळी आव्हाने आपल्या समर्थ खांद्यांवर पेलून घेत त्याचा प्रवास चालूच राहिला. कधी यशाचं दान पडंत गेलं, तर कधी निराशेचं दान अपयशाला द्यावं लागलं. या सगळ्यातूनच कळत नकळत  शाखा विस्तारू लागल्या. फुलू फळू लागल्या. दिवस पिकू लागला.  अधूनमधून घडून गेलेल्या गोष्टी आठवू लागत. दुरावलेल्यांच्या स्मृतींचे सल पुन्हा पुन्हा हलकेच ताजे होत. कशाची समजू नये, पण हुरहुर लागून राही.
एकदा असंच त्याच्या लक्षात आलं, अरे, ही तर सांजेची चाहूल आहे. 
***
मग त्याचं मन सगळा ताळेबंद मांडू लागलं. उत्तर आलं, आता यापुढे खरंखुरं जगायचंय. मग एक एक ओझी हलकेच उतरवायला त्याने सुरुवात केली. प्रखरता गेली, सौम्यपणा आला. कठोरपणा विरघळून मार्दव आले. मन हृदय विशाल होत गेले. मग संध्येचे रंगही तनामनात सामावू लागले. सुखाचे असे अनेक क्षण येत राहिले, जात राहिले. 
आणि मग ती वेळ जवळ आली. 
***
बाहेरचा गलबला केव्हाच बंद झालेला. मनातला कोलाहलही संथपणे थंडावू लागला. आठवणींचे सगळे ठसे अलगद पुसून गेले. पिंडाची पाटी पुन्हा एकदा कोरी झाली. एका अनाहत नादाची अनुभूति आसमंतात पुन्हा एकदा जाणवू लागली. आणि जोडीला तीच लोभसवाणी शांतता. 
मिटल्या डोळ्यांनी त्याने ती शांतता मन भरून ऐकून घेतली, आणि थकला भागला कृतार्थ दिवस त्या अथांग स्थिर गाढ रात्रीच्या कुशीत शिरण्यासाठी सिद्ध झाला.
उद्या पुन्हा नव्याने उगवण्यासाठी.

***