गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१९

रसग्रहण (हायकू)

मी तिच्यासह-
क्षितिजावर शांत,
रम्य एकांत.

डॉ. सुधीर काटे.

फक्त सहा शब्दांची, तीनच ओळींची छोटीशी हायकू. एका हळव्या कवीची तितकीच हळवी कविता. 
वरवर पहाता, रम्य एकांतात शांत बसलेली प्रेमिकांची एक छानशी जोडी आपल्याला दिसते. 
पण 'क्षितिजावर ' या शब्दापाशी आपण जर अडखळलो, तर संपूर्ण कविता एकदम झळाळून उठते. विजेसारखी चमकून जाते.
असं काय आहे या एकाच शब्दात ?

क्षितिज-
सागरकिनारी , नदीतिरी, तरुतळी, डोंगरकड्यावर, अशा निसर्गरम्य ठिकाणांवर प्रेमीजन एकांत मिळविण्यासाठी जातात. तिथे निवांत, शांत बसून दूरवर क्षितिज पहात असतात. त्यांना क्षितिज दूरवर  दिसत असते. 
कवीचा हा एकांत मात्र थेट क्षितिजावरच आहे. त्यामुळे क्षितिज दूर न रहाता, कवितेने आणि कवीने एकदम उंची गाठलीय, थेट अवकाशाची.
क्षितिजावर कोण असतं ?
क्षितिजावर कोण दिसतं ?
क्षितिजावर कोण भेटतं?

चंद्र, सूर्य, तारे, संध्या, उषा.....
निसर्गनाट्यातली ही पात्रं .
चंद्र आणि सूर्य, उगवताना आणि मावळतानाच फक्त क्षितिजावर दिसतात. यावेळी त्यांचे रूप रम्य, सौम्य, स्नेहल, आरक्त असे असते.
ही आरक्ती अनुरक्ती आहे. एकांतातला हा अनुराग आहे.

तिच्यासह-
चंद्र रोहिणीसह, सूर्य संध्येसह, तसेच सूर्य उषेसह. अशा या जोड्या. 

एकांत-
इतर सर्वांपासून दूर, म्हणजे एकांत . इथे तर पृथ्वीपासून दूरचा हा एकांत दिसतो. किती दूर ?
आंतर प्रकाशवर्षात मोजण्याइतके. कुठल्या उपद्रवाचा  संभवच नाही. हा खरा एकांत.

शांत-
चंद्र तर शांत, शीतलतेचेच रूप. सूर्यही क्षितिजावर असण्याच्या वेळी, सकाळी आणि सायंकाळी शांतच असतो. यांच्या शांत असण्याने, बाकी आसमंतात मात्र बरेच काही सुखद घडत असते. 

तो तिच्यासह एकांतात आहे, आणि दोघेही शांत आहेत, तर ही नक्कीच मीलनानंतरची तृप्त शांतता आहे. 

रम्य-
सर्व उपाधींपासून दूर, फक्त आपल्या 'तिच्यासह' असल्याने, या दोघांचा एकांत रम्य असणारच.  
चंद्र रोहिणी, सूर्य संध्या, तसेच सूर्य उषा या जोड्यांना क्षितिजावर साक्षी ठेवून पृथ्वीवरील जे प्रेमीजीव एकांतात भेटतात, त्या सर्वांचाही एकांत या क्षितिजवासींनी किती रम्य करून टाकलाय!

मी-
या पहिल्याच शब्दात कवीचा आत्मविश्वास दिसतो.
' मी ' च्या अस्तित्वामुळे क्षितिजावरची ही भव्य निसर्गनाट्ये घडलेली आपण पाहू शकतो. चराचराशी एकरूपता, मी आणि निसर्ग वेगळे नाही, ही भावना, ' मी ' ही व्यक्ती न रहाता एक भावना, एक काव्य बनून जाते. 

केवळ ५- ७- ५ अक्षरांच्या तीन ओळींमध्ये एक नाही, दोन नाही, तर तीन तीन भव्य निसर्गचित्रे, भावनाचित्रे  दाखवली.

एकांतातील भेटीसाठी क्षितिज निवडताना इथे आणखीही अर्थ असू शकेल.
इथे जगताना घडू न शकलेली भेट जगण्यानंतर तर घडत नसेल ?
असीम एकांतात, असीम शांततेत, असीम रम्यतेत!

क्षितिज हा एक भास आहे. 
आकाश जमिनीला मिळाल्यासारखं दिसतं, पण प्रत्यक्षात ही भेट कधीच घडत नसते. 
फक्त आभास. 
तिच्यासह असलेला हा रम्य एकांत पण फक्त कल्पनेतला, आभासी तर नाही ?

सहा शब्दांच्या तीनच ओळींमध्ये एवढं ब्रह्मांड !
सलाम त्या कवीला !

                             ***




गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१९

महामानव बाबा आमटे आणि त्यांचे सर्व समर्पित कुटुंबीय यांच्याबद्दल आता नवीन सांगण्यासारखे काही नाही. किंबहुना जेवढे बोलावे तेवढे कमीच.
सलग तिसर्या पिढीने एकच कार्य, ते ही समाजकार्य, मनःपूर्वक पुढे नेणे, अध्याहृत असल्याप्रमाणे एक एक अशक्य जबाबदार्या स्वतःहून अंगावर घेणे, आणि बेफाट प्रयत्नांनी तन मन आणि धनापेक्षाही खूप अधिक काही  देऊन त्या यशस्वीपणे पार पाडणे, यांत सातत्य ठेवणे असे उदाहरण जगात इतरत्र दिसणे कठिण.
आनंदवन, लोकबिरादरी प्रकल्प, सोमनाथ प्रकल्प, नागेपल्ली प्रकल्प, हेमलकसा प्रकल्प, आणि अगदी नवीन असे विदर्भातील झरी जामणी येथे सुरु केलेले काम, ही सर्व शून्यातून उभी केलेली तीर्थक्षेत्रे आहेत.
हे सर्व कुठून सुरू झाले, का सुरू झाले, कसे कसे होत गेले, आणि आज काय चालू आहे, यांबद्दल स्वतः  या दोन सुपुत्रांनी लिहून ठेवले आहे. "प्रकाशवाटा" हे समर्पक नाव घेऊन मा. डॉ. प्रकाश आमटे यांनी हेमलकसा जंगल आणि आदिवासी यांच्या कायाकल्पावर प्रकाश टाकला आहे, तर मा. डॉ. विकास आमटे यांनी बाबांचे काम पुढे नेताना केलेल्या विस्मयकारी प्रयोगांची माहिती "आनंदवन प्रयोगवन" या पुस्तकामधून दिलेली आहे.
हेमलकसा येथील प्राण्यांचे अनाथालय कसे सुरू झाले, त्यावरील तथाकथित जप्ती, आणि त्यांतील असंख्य चमत्कारसदृश घटना यांची चित्तथरारक चित्रकथा श्री. विलास मनोहर यांच्या नेगल, नेगल २, तसेच रानमित्र या डॉ. प्रकाश आमटे यांच्या पुस्तकांमधून पहाता येते.
याचबरोबर "समिधा" (सौ. साधना आमटे यांचे आत्मचरित्र), तसेच पु. लं. नी बाबा आणि आनंदवनावर लिहिलेले लेख, तारा धर्माधिकारी आणि भ. ग. बापट यांनी लिहिलेली बाबांची चरित्रे, स्वतः बाबांची  "ज्वाला आणि फुले", "उज्ज्वल उद्यासाठी" हे ही नजरेखालून घालता आलं, तर
काजळमाया, पिंगळावेळ, आणि अशाच अनेक गूढगहन पुस्तकांमधून जी.ए. आपल्याला भेटतात. त्यांच्या एकांतप्रीय स्वभावामुळे हे गूढतेचे वलय शेवटपर्यंत कायम राहिले होते.
पण "माणसे, अरभाट आणि चिल्लर" मधे त्यांच्या नेहमीच्या  वेगळ्याच पातळीवर अस्तित्वात असलेल्या जगातून ते आपल्या जगात आल्याचे जाणवले होते.
"बखर बिम्मची" (बिम नाही हं, बिम्म. ) हे पुस्तक वाचल्यानंतर  अनेक जी. ए. प्रेमींप्रमाणेच मलाही सुखद धक्का बसला.
आपल्या कथांमधून मेंदूला झिणझिण्या यायला लावणारे जी.ए. , हे इतकं लोभस, इतकं निरागस, इतकं छान, सोपं लिहू शकतात!
अर्थात हे पुस्तकही आपला संपूर्ण कब्जा घेतेच.
मुखपृष्ठावरील, चित्रकार शाम जोशींचे चित्र पाहून हे लहान मुलांचे पुस्तक असल्याचे समजते, आणि ते खरेही आहे.
पण मुलांइतकाच मोठ्यांचाही हा बिम्म एकदम लाडका बनून जातो.
अंदाजे ३ - ४ वर्षांचा बिम्म, त्याची शाळेत जायला लागलेली बहिण बब्बी, या दोघांची आई, परगावी असलेले बिम्मचे वडील, बब्बीच्या मैत्रिणी, रिकाम्या घरासमोर भेटणारे आजोबा, एक गाय, एक हत्ती, बाबांचे पत्रं, आणखी असाच काय काय , बराच गोतावळा आहे इथे.
बिम्मच्या नजरेतून, त्याच्या चिटुकल्या, पण तरीही अफाट जगाची आपण सफर करुन येतो.
आजोबांनी बिम्मलाच पतंग म्हणून उडवल्यावर आपण पण हलके होऊन त्याच्याबरोबर उडू लागतो.
बाबांचं पत्रं खरोखरीच आल्यावर आईबरोबर आपलेही डोळे पाणावतात.
गाय काय काय खाते, आणि मग काय होते, हे ज्ञान तर एकदम भारी.
हत्तीबरोबरचा एक दिवस मज्जाच मज्जा.
आणि रिकाम्या घरातल्या शिपायाचा तोरा एका वाक्यात बिम्म कसा उतरवतो, हे तर वाचायलाच पाहिजे.
जी.एंच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे वास्तव आणि आभास यांची सरमिसळ झालेली इथेही आहे. पण ती छोट्यांच्या जगात इतकी बेमालूम सामावलीय, की जबरदस्तच.
मला खूप आवडलेले हे पुस्तक आहे.
"वाचू आनंदे" ही चार पुस्तकांची पुस्तकमाला आहे. माधुरी पुरंदरे आणि नंदिता वागळे यांनी अतिशय परिश्रम करून या चार भागांची निर्मिती केल्याचे वाचताना वारंवार जाणवत रहाते.
रूढ पुस्तकांपेक्षा अगदी वेगळ्या प्रकारची, आणि वाचनीय बरोबरच अतिशय प्रेक्षणीय अशी ही पुस्तके हातात घेतल्यावर खिळवून ठेवतातच.
मराठीतील अनेक प्रसिद्ध, अप्रसिद्ध जुन्या नव्या लेखक, कवींच्या उत्तमोत्तम कलाकृतींमधील काही भागांचे संकलन- असे यांचे  सर्वसाधारण स्वरूप सांगता येईल.
पण हे एवढेच नाही. पुस्तकांचे देखणेपण वाढवणारी आणखी एक गोष्ट, म्हणजे त्यातील फोटो, आणि चित्रे. भारतातील अनेक प्रांतांमधील शिल्पांचे, तैलरंग, जलरंगांतील चित्रांचे, लोकचित्रकलेचे, असे चोखंदळपणे निवडलेले अनेक फोटो रसिकमनाची तृप्ती करतात. योग्य त्या जागी विषयानुरूप केलेली त्यांची योजना साहित्याची रुचीही वाढवते. आपल्याकडे कलांचा केवढा समृद्ध वारसा आहे, हे जाणवून मन थक्क होते. (आणि हे सर्व फोटो रंगीत असते तर - - असेही वाटत रहाते.)
चारपैकी दोन भाग कुमारांसाठी, आणि दोन बालवाचकांसाठी, असे म्हटले असले, तरी सर्व वयांचे वाचक यांचा आनंद घेऊ शकतात. कारण, दर्जा, आणि उत्तम तेच निवडणे हे सूत्र सांभाळले आहे.
एकदा वाचायला सुरु करून सलग वाचून संपविण्याच्या प्रकारातली ही पुस्तके नाहीत. केव्हाही, कुठलाही भाग उचलावा, अधले मधले काहीही वाचावे, आणि आनंद घ्यावा.
 बाल आणि किशोर गटातील वाचकांसाठी ही एक शोकेस, किंवा संपादिकेच्या म्हणण्यानुसार, किलकिली केलेली एक खिडकी आहे. खजिन्याकडे जाणार्या अनेक वाटांपैकी एका वाटेवर या दोघींनी वाचकांना आणून सोडले आहे.
यामुळे वाचनाची भूक भागणार नाही, तर चाळवणार आहे. चांगले साहित्य कसे असते, हे कळले, की काय वाचावे, याची समज आपोआप वाढत जाते.
संपादकीय/ प्रस्तावनाही वाचनीय आहे.
कुठल्या लेखक /कवींचे साहित्य निवडले, यांचे उदाहरण द्यायचे, तर सगळ्यांचीच नावे घ्यावी लागतील, कारण टाळण्यासारखे काही नाहीच. यासाठी एका अनुक्रमणिकेचा फोटोच देत आहे. उदाहरणार्थ.
प्रत्येकाच्याघरात संग्रही असावीत अशी ही पुस्तके आहेत.
पुढील भागही अपेक्षित आहेत.
रमा खटावकर .
२०१६ या वर्षाचा शेवट, आणि २०१७ची सुरुवात.
आदर्श, विकास आणि श्रीकृष्ण ही तीन विशीच्या आसपासची मुले आपल्याच आदिवासी बांधवांच्या जीवनाबद्दल उत्सुकता मनात धरुन सायकलवरुन प्रवास सुरू करतात. आपलेच लोक आपल्याच विरुद्ध बंदुका रोखत नक्षलवादी का होतात, हा त्यांना पडलेला आणखी एक प्रश्न. तो सोडवण्यासाठी भामरागडच्या पलिकडे, छत्तिसगढच्या प्रत्यक्ष नक्षली भागात, सगळ्यांच्या सूचना झुगारून ते सायकली दामटतात. मग बातमी येते, की तीन मुलांना नक्षलवाद्यांनी पकडले.
चार दिवसांनंतर त्यांची नाट्यमय रितीने सुटका केल्याच्या पण बातम्या झळकतात.
हे नक्षल्यांच्या कैदेतले चार दिवस, आल्यानंतर ते शब्दबद्ध करतात.
साधना प्रकाशन " तीन मुलांचे चार दिवस" या नावाने याला पुस्तकाचे रूप देते,
एकच अनुभव, तिघांच्या नजरेतून.
असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.
या वयातल्या शहरी मुलांना सुटीत असे काही करावेसे वाटणे, हीच खूप मोठी गोष्ट आहे.
तिघेहीजण मुळात लेखक नसल्याने, आपल्या अकृत्रिम शैलीत, डायरी लिहावी तसे हे लेखन त्यांनी केले आहे. आणि हेच या पुस्तकाचे बलस्थान आहे.
या सफरीमधली अनेक छायाचित्रे पुस्तकात समाविष्ट केली आहेत.
मुखपृष्ठावरील तिघांचे बोलके चेहरेच खूप काही सांगून जातात. त्यांची प्रगल्भता, जिद्द, उत्साह, आणि सकारात्मकता हे सगळे चेहर्यावर दिसते.
आजच्या तरुणाईविषयी जे लोक निराश आहेत, त्यांच्यासाठी आशेचा किरण आणण्याचे काम हे पुस्तक नक्की करेल.
संपादक विनोद शिरसाठ यांनी प्रस्तावनेत या पुस्तकाच्या निर्मितीचा प्रवास सांगून रोचकता आणखी वाढवली आहे.
वृत्तपत्रांतील कात्रणे, मुलांनी बनवलेल्या नकाशाचे छायाचित्र, अशा गोष्टी पण यात समाविष्ट केल्या आहेत.
त्यामुळे आपण एक सत्यघटना वाचत आहोत, याचा क्षणभरही विसर पडत नाही.
थोडक्यात म्हणजे ज्यांनी अजून वाचले नाही, त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावे.
(रसग्रहण- रमा खटावकर.)
या दोनही पुस्तकांचा परिचय द्यायची खरंतर काही गरजच नाहीये.
छापिल स्वरुपात आहेत, म्हणून पुस्तकं म्हणायचं, नाही तर स्वयंपाकघरात प्रयोग करणार्या प्रत्येकाला आपली आई, आजी, किंवा जवळचं कुणीतरी आधाराचं असल्यासारखं वाटतं, ही पुस्तकं घरात असली की.
२८ च्या वर आवृत्या निघाल्यात.
कै. कमलाबाईंची प्रस्तावना पण खूप छान आहे.
त्यांनी आपल्या सासूबाईंकडून हे  सगळं शिकून घेतलं. प्रत्येक पदार्थ स्वतः बनवून, चविष्ट आणि आरोग्यपूर्ण होण्यासाठी त्यात बदल करून प्रमाणं ठरवून, मगच पुस्तकात समाविष्ट केला आहे.
विशेषतः पहिला भाग जास्त उपयोगी वाटतो. रोजच्या वापरातले खास मराठी वळणाचे पदार्थ , यात साध्या भाताच्या प्रकारांपासून वरण, आमट्या, भाज्या, असं सगळं आहे. जसं सांगीतलंय, अगदी तसंच करत गेलं , तर हमखास यशाची खात्रीच.
स्वयंपाकघरात वावरण्याची सवय नसलेल्या नवविवाहितांना याचा उपयोग होतोच, पण अनुभवी सुगरणींना देखील यात दरवेळी काहीतरी नवीन सापडतेच.
साठवणीचे पदार्थ, मधल्या वेळचे पदार्थ, मुरांबे, लोणची, अन्य प्रादेशिक पदार्थ , पक्वान्ने, उपासाचे पदार्थ असे वेगवेगळे विभाग यात आहेत.
भाषा साधी, सोपी, सहज कळेल अशी.
मापासाठी वाटी आणि चमचा ही व्यावहारिक साधनेच आहेत. त्यामुळे दीड इंच आलं, किंवा इतके ग्रॕम रवा,असला काटेकोरपणा  नाही.
हे पुस्तक मी फाटेपर्यंत वापरलं, नंतर बाईंडिंग करुन वापरलं. माझ्या आईला पण यातले खूप संदर्भ उपयोगी पडले. आता माझ्या सुनांना पण कमलाबाईंचा आधार आहे.
बाजारात पाककलेची असंख्य पुस्तके उपलब्ध आहेत, पण यासम हेच.
"ही आठ मुलं, म्हणजे नियतीनं आईला घालून ठेवलेली आठ कोडी. "
या एका वाक्यात "करुणाष्टक" चं सगळं सार सामावलं आहे.
खेड्यात वाढलेली, गरीब ब्राह्मणाची मुलगी, तिचा शांत, गरीब स्वभावाचा पती, आणि एकामागून एक अवघड अवघड कोडी घालत जाणारी नियती.
ही सगळी कोडी सोडवण्यात त्या माऊलीचं आयुष्यच करुणाष्टक बनून गेलं.
'आधुनिक वाल्मिकी' म्हणून प्रसिद्ध झालेले गीतरामायणकार कविवर्य ग. दि. माडगूळकर , आणि लेखक, प्राणिप्रेमी, जंगल वाचक, रेखाचित्रकार, चित्रपट कथालेखक श्री. व्यंकटेश माडगूळकर , ही त्या माऊलीने महाराष्ट्राला भेट दिलेली दोन रत्ने.
लेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी आपल्या आईची जीवनगाथा , तिचे कष्टमय आयुष्य, मुलांच्या प्रगतिसाठी, आणि घरादाराच्या उत्कर्षासाठी तिची चाललेली तडफड, याबरोबरच शिकलेली नसूनही तिच्यात असलेला व्यवहारीपणा , आणि नवर्याच्या शांत, थंड स्वभावाचा परिणाम म्हणून की काय, तिच्यात आलेला तापटपणा, फटकळपणा, हे सारे "करुणाष्टक" या पुस्तकात चित्रित केले आहे.
समर्थ रामदासांनी प्रभूरामचंद्राला उद्देशून रचलेले, अतिशय कळवळून त्याची प्रार्थना करणारे आठ श्लोक हे करुणाष्टके म्हणून ओळखले जातात. अनुदिन अनुतापे -- अशी सुरुवात असलेले हे श्लोक आजही अनेक घरात म्हटले जातात. त्यातील जो भाव आहे, तो या सर्व कथनात भरून राहिला आहे.
माणदेशी माणसं, बनगरवाडी, सत्तांतर, वावटळ, अशा अनेक पुस्तकांतून आपल्याला त्यांच्या सहज, सोप्या, आणि मनाला थेट भिडणार्या शैलीची ओळख झाली आहे.
या पुस्तकात आपल्या आईबद्दल लिहिताना सर्व औपचारिकता गळून पडली आहे. एखाद्या देवळाच्या कट्ट्यावर, किंवा गावातल्या पारावर बसून आपल्याशी ते मनातल्या गोष्टी बोलत असावेत, इतकी सहजता या लेखनात आहे.
पुस्तक शांतपणे, त्याच गांभिर्याने वाचले, तर वेळोवेळी आईच्या आठवणीने भरून आलेले त्यांचे मनही आपल्याला समजू शकते.
आईच्या बरोबरीने या सर्वच भावंडांचे कष्टमय आयुष्य आपल्यासमोर येते. १९४७ च्या आसपासचा काळ डोळ्यासमोर उभा रहातो.
आपल्या मोठ्या बंधूंबद्दलही अतिशय संयमाने, ओघाने आले, तसे लिहिले आहे.
वडिलांबरोबर काढलेल्या दिवसांचेही खूप लोभस वर्णन आहे.
काही काही वाक्ये कायमची डोक्यात घुसून रहातात. जसे- -
"आणि स्वर्गातून देवदर्शन व्हावे, तसे विहिरीच्या काठावरुन डोकावणारे दादा मला विहिरीच्या तळातून दिसले. "
तसंच- -
"यानंतरही खाईत पडण्याचा उद्योग मी बर्याच वेळा केला, पण तेव्हा मला बाहेर काढायला दादा नव्हते."
या पुस्तकाचे मुखपृष्ठ, आणि आतली सर्व रेखाचित्रे त्यांची स्वतःची आहेत.
थोडक्यात म्हणजे, प्रत्येक मराठी पुस्तकप्रेमीच्या संग्रहात असायलाच हवे, असे हे पुस्तक आहे.
पुस्तकांचे गाव- भिलार
- रमा खटावकर

पुस्तकांचे गाव- भिलार याबद्दल खूप ऐकले होते. काही महिन्यांपूर्वी  प्रत्यक्ष भेट द्यायचा योग आला. याबद्दल आवर्जून सर्वांना माहिती द्यावी, असे वाटले, म्हणून फोटोही काढले.
पूर्वी स्ट्रॉबेरीसाठी आणि सध्या त्याचबरोबर पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेले हे भिलार गाव महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील  पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणापासून आठ कि.मि. आंतरावर आहे.

अवघ्या दोन कि.मि. विस्तार असलेल्या या छोट्याशा पण टुमदार गावाने भारतातील पहिले "पुस्तकांचे गाव" होण्याचा मान पटकावला आहे. पुस्तके आणि साहित्यासंदर्भातील ओळख असल्यामुळे याबरोबरच येणारा सुसंस्कृतपणा गावात फिरताना पदोपदी जाणवतो.
गावातील काही घरांनी (प्रथम २५ घरे होती, आता ३० झाली आहेत.) आपल्या घरातीलच एका खोलीचे ग्रंथालय बनवले आहे. अतिशय नेटकेपणे ठेवलेली एकेका विषयावरील  पुस्तके, तिथेच बसून वाचनाची उत्तम सोय, वाचनासाठी आवश्यक असे वातावरण, घरातील व्यक्तींचे प्रसन्न, अगत्यपूर्ण सहकार्य या गोष्टी अनुभवून रसिक वाचकाचे मन प्रसन्न होते. आपण स्वतः पुस्तकांच्या कपाटांमधून, रॕक्सवरून पुस्तके घेऊन हाताळू शकतो.
हे सर्व संपूर्णपणे निःशुल्क आहे.
प्रत्येक पुस्तकालयात सुबक अशी पुस्तकसूची, अभिप्राय वही, वर्तमानपत्रातील भिलारसंबंधित बातम्यांची कात्रणे असलेली चिकटवही असे सर्व ठेवलेले असते.
कादंबर्या, विनोद, ऐतिहासिक , नियतकालिके, दिवाळीअंक, बोलकी पुस्तके, अशा ३० पद्धतींनी वर्गीकरण केले आहे.
प्रकल्प सुरू झाला, त्यावेळी सुमारे १५,००० पुस्के होती, आता ही संख्या २५,००० झाली आहे.
सर्व पुस्तके फक्त मराठीतलीच आहेत.
पुस्तकविक्रीचे दुकान मात्र एकच आढळले.
एक प्रकल्प कार्यालयही आहे.
साहित्यविषयक कार्यक्रमांच्या सादरीकरणासाठी एक नाट्यगृहही आहे.
या गावातून फिरताना गावातील भिंतींवर, घरांवर, पुस्तकांच्या संदर्भातलीच सुंदर सुंदर चित्रे, कार्टून्स दिसतात. आपल्या पु. लं.चं एक कार्टून तर सेल्फी पॉइंट म्हणून प्रसिद्ध झालं आहे. गावात कुठल्या घरात, कुठल्या विषयाची पुस्तके आहेत,  त्याच्या locationचा एक नकाशाही  लावला आहे. त्यामुळे आपले शोधणे सोपे होते.
गावाबद्दल आणखी कुतूहल वाढले, आणि खालील माहिती मिळाली.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाने हा आगळावेगळा उपक्रम राबविला गेला आहे.
४ मे २०१७ रोजी मा. मुख्यमंत्री श्री. देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले.
याआधी तीन दिवस एक बस करून चित्रकार इथे आले होते. त्यांनी सगळं गाव छानछान चित्रांनी भरून टाकलं.
ब्रिटनमध्ये "Hay on Wye" या नावाचे एक गाव आहे. पुस्तकांची दुकाने, व साहित्यसंदर्भातील उत्सव- उपक्रमांसाठी ते प्रसिद्ध आहे. या गावावरून भिलार- पुस्तकांचे गाव बनविण्याची प्रेरणा मिळाली, असा उल्लेख मिळतो.
हवामान आल्हाददायक असल्याने, गावात फिरण्याचे श्रम आजिबात जाणवत नाहीत.
तरीही श्रमपरिहारासाठी प्रत्येकाच्या रुचीनुसार अल्पोपहार, तसेच भोजनगृहेही आहेत. अर्थातच तिथेही पुस्तकांची सोबत सुटत नाहीच.
हंगाम असेल तर मधुर अशा स्ट्रॉबेरींचा पण आस्वाद घेता येईल.
गावात फिरताना अनेक ठिकाणी स्ट्रॉबेरीची लागवड केलेलीही पहायला मिळाली.
"भारतातील पहिले" असा या गावाचा उल्लेख पाहिल्यावर गूगल सर्च केले, तेव्हा वरील ब्रिटनमधल्या गावाखेरीज library tourism म्हणून ओळखली जाणारी फ्रान्समधली आठ गावे अशाच वर्णनाची (book towns) आढळली. बाकी कुठेही असा उल्लेख नाही.
तर मग याला अशियातील अशाप्रकारचे पहिले गाव म्हणण्यास हरकत नसावी.
प्रत्येक पुस्तकप्रेमीने एकदा तरी भेट द्यावी आणि पुस्तकांमधे हरवून जावे, असे हे गाव नक्कीच आहे.

गुरुवार, ४ जुलै, २०१९

जपानी रमलाची रात्र- (कवी बा. भ. बोरकर.)
'चांदणवेल' या कवितासंग्रहातील ही एक खूप गाजलेली कविता. मीलनाच्या वास्तव, उत्कट अनुभवाला या कवितेत त्यांनी सुंदर काव्यरूप दिले आहे. 'पूर्वरंग' मध्ये पुलंनीही याचा उल्लेख केला आहे. भाईंच्याच आवाजातले या कवितेचे अप्रतीम काव्यवाचनही यू- ट्यूबवर उपलब्ध आहे.
खूप वर्षांपूर्वी पूर्वरंगमध्ये याचा उल्लेख वाचल्यावर उत्सुकता जागी झाली होती, आणि कविता मिळवून वाचली होती. अर्धवट कळत्या वयात, यातलं काही कळलं, काही कळलं नाही.
फेसबुकवरील याच कवितेवरील एका लेखामुळे या कवितेची पुनर्भेट झाली. (समूह- मराठी पुस्तकप्रेमी. लेखिका- नीलिमा सुर्वे , दि. २९ जून, २०१९. सायं ९.४७.)
या लेखात त्यांनी अनेक शंका उपस्थित केल्या होत्या. त्यांचे निरसन करताना कविता नव्याने समजत गेली, आणि दुस-या एका कवितेची आठवण पुन्हा पुन्हा जागी होत राहिली.
त्या कवितेत जे म्हटलंय, तेच बोरकरांनी पण म्हटलंय.
त्या कवितेतला थेट धीटपणा भावतो. तिथे कवितेला जास्त नट्टापट्टा केला नाहीये.
बोरकरांचा अनुभव मात्र नटून सजून, साहित्यातील अनेक संदर्भांचे दागिने लेवून आलाय.
पण इथेही पडदे नाहीत. जे म्हणायचे, ते लपवले नाही. थेटपणा तोच.
दोन्ही कवितांचा आस्वाद घेताना 'उत्सव' चित्रपटातली, केवळ दागिनेच परिधान ची अट पाळणारी रेखा, काव्य होऊन डोळ्यांसमोर उभी रहाते.
दागिन्यांव्यतिरिक्त केवळ कोरा अनुभव. मध्ये काहीच नाही.
*उत्कटतेला व्यक्त रूप देणे, हे दोनही कवींनी प्रामाणिकपणे, मनापासून केले आहे.
लेण्यांमधली नितांतसुंदर नग्नता, तिला जणू काव्यात बांधले आहे.
* एका अतिशय मौलिक ( मूलभूत, basic, याअर्थी) अनुभवाला, कुठलीही अश्लीलता, बिभत्सता येऊ न देता काव्यरुपात व्यक्त केले आहे.
* सहसा व्यक्त न होणारे अनुभव, कवितेच्या बीजरुपात जन्मणे, आणि त्यांचा परिपोष होणे, (elaboration)
या सगळ्या निकषांवर, माझ्या मते दोनही कवी समान पातळीवर आहेत.
***
मूळ कविता, FB post & my comments जोडत आहे.

जपानी रमलाची रात्र
************ बा.भ.बोरकर

तुझे विजेचे चांदपाखरू दीप-राग गात
रचीत होते शयनमहाली निळी चांदरात

रतीरत कुक्कुट साकुंडीवर आरोहूनी माड
चोच खुपसुनी फुलवीत होता पंखांचे झाड

अद्भुत पंख्यासम भिंतीवर आंदोलुनी छाया
लावित होत्या ताप जगाचा नकळत विसराया

धूप ऊसासत होता कोनि रजताच्या पात्री
विचित्र रेशिमचित्रे होती रसावली गात्री

तुझा पियानो यक्ष जळातील होता निजलेला
मनात गुंफित स्पर्श-सुखांच्या स्वप्नांचा झेला

अन् म्युसेची कवने होती माझ्या हातात
प्रतिचरणाला करित होती धूम्रवेल साथ

जळत ऊसासत होते त्यासह अंतरात काही
होता चिमणा श्वान लोकरी घोटाळत पायी

तोच वाजल्या तुझ्या सपाता सळसळला घोळ
आलीस मिरवीत जाळीमधुनी नागिणीचा डौल

करांतुनी तव खिदळत आले स्तनाकार पेले
जळता गंधक पांच उकळता याही रंगलेले

अभिष्ट चिंतुनी आम्ही त्यांचे भिडवियले काठ
सुरेहुनी तु गडे भाजिले ओठांनी ओठ

स्पर्शे तुझिया आणि पियानो थरारला सारा
मज सम त्याच्या कानशिलाच्या झणाणल्या तारा

गंधर्वांच्या दुहिता जमल्या करित पुष्पवृष्टी
हृदय मदाचे मोहळ झाले जडावली दृष्टी

पोहू लागले तुझ्या रेशमी अलकातील मासे
हवा जाहली जड पा-यासम अंगातील वासे

आणि तरंगत डुलु लागली नौकेसम शेज
तो कांतितुन तुझ्या निथळले फेनाचे तेज

नखे लाखिया दात मोतिया वैडूर्यी नेत्र
अवयव गमले चपल चिवट की मयवनीचे वेत्र

कात सोडिल्या नागिणिचे ते नवयौवन होते
विळख्याविळख्यातुनि आलापित ज्वालांची गीते

गरळ तनुतील गोठुन झाले अंतरात गोड
कळले का मज जडते देवा नरकाची ओढ

डोळे बांधुन खेळत होते जीवन मायावी
अंधपणातच वितळत होते भूत आणि भावी

तुझ्या जपानी भाषालिपिसम अगम्य सुन्दरता
असुनि हाती उरली दुर्लभ आली ना हाता

आजही तुज शोधता कधी ती रमलाची रात्र
पाठितुनि जंबिया मधाचा घाली काळजात.
***
FB post

खरं तर चांदणवेल हा बोरकरांचा काव्यसंग्रह 2003/04 ला अभ्यासाला होता पण तेव्हा या अशा अडलेल्या शंका विचारण्याचं धाडस नव्हतं. आता पुन्हा सहज म्हणून हाती घेतलं वाचायला म्हणून तेव्हा काही काही गोष्टी समजूनही समजत नसलयासारख्या वाटल्या आणि काही समजत नाहियेत पण तरीही त्यातली गोडी मात्र जाणवली की काही वेगळंच वाटतंय म्हणून काही कवितांमधून जे अडेल ते विचारावं या हेतूने मी माझ्या मनातील काही शंका इथे ठेवते आहे तरी कृपया आपण मला त्या समजून घेण्यास सहकार्य करावे. कित्येक चांगल्या कविंमधला हा असा भुरळ पाडणारा कवी असंच म्हणावं लागेल बोरकरांच्या बाबतीत.

जपानी रमलाची रात्र या कवितेत, रतिरत कुक्कुट, म्यूसेची कवने, वेत्र, अलकातिल मासे, वासे,  जंबिया असे काही शब्द वा प्रयोग झाले आहेत ते जरा कुणी स्पष्ट सांगूशकेल का? शक्य असल्यास मी फोनवरही बोलायला तयार आहे फक्त कुणी मेसेंजरवर कळवावे.

गंधर्वांच्या दुहिता जमल्या करित पुष्पवऋष्टी, हृदय मदाचे मोहळ झाले जडावली दृष्टी. इथे मद या शब्दाचा अर्थ गर्व असाच घ्यायचा का?

नखे लाखिया, इथे लाखिया हा कोणता दागिना आहे का? गरळ तनूतील गोठून झाले अंतरात गोड. पुन्हा गरळ हा शब्द कशा
अर्थाने घ्यायचा?रमला याचा नीट अर्थ सांगेल का कुणी?

my comments-


*नखे लाखीया, म्हणजे लाखेच्या रंगाची. रसरशीत लाल.

*गरळ तनूतिल- -
नायिकेच्या यौवनाला कात टाकलेल्या नागिणीची उपमा दिली आहे, त्या संदर्भात इथे गरळ म्हणजे विष. नागिणीचे विषही विषयवासनेत मधुर झाले/ भासले, या अर्थी.

* जंबिया मधाचा - -
जंबिया म्हणजे कट्यारीसारखे शस्र.
इथे ही प्रेमातील मधाची कट्यार आहे.
जसा नयनबाण, भ्रूधनू इ. , तसे हे मदनाचे अस्त्र.

*हृदय मदाचे मोहळ - -
हत्ती इ. प्राणी माजावर आल्यावर गंडस्थळातून मदाचा स्राव होतो.
त्या अर्थाने मद हा शब्द भावना / वासना अनावर होणे, हृदयात प्रेमभाव ओथंबून येणे अशा अर्थी.

*रमल म्हणजे जादू. जादूटोणा, मायावी, आभासी या अर्थी.

*वेत्र म्हणजे बांबू.
कवितेत " अवयव मयवनिचे वेत्र " म्हटले.
रतिक्रीडेमधे अपेक्षित flexibility कोवळ्या/ हिरव्या बांबूच्या फोकासारखी. तसेच कांती, comlexion ही. तसेच सडसडीतपणा.

*वैडूर्य हे एक रत्न आहे. पिवळसर तपकिरी रंग. नवरत्नांपैकी. यालाच cat's eye असेही म्हणतात. याला घुमटासारखा आकार दिला, तर मांजराच्या डोळ्यासारखी चमकदार रेघ दिसते.
याची उपमा नायिकेच्या डोळ्यांना दिली आहे.

*या निमित्ताने या सर्वांगसुंदर कवितेची पुनर्भेट घडवलीत.
खूप खूप धन्यवाद.

***
काही राहून गेलेल्या शंका -

* रतिरत कुक्कुट-
कुक्कुट म्हणजे कोंबडा. त्याची प्रणयाची क्रीडा.

* म्युसेची कवने- अल्फ्रेड म्युसे या नावाचा प्रेमकविता करणारा फ्रेंच कवी होता.  त्याच्या कविता.
तसेच ग्रीक पुराणात म्युसे या ९  स्त्रीदेवता कलेच्या स्फूर्तीदेवता मानल्या जातात.

* अलकातिल मासे-
अलक  म्हणजे संस्कृतमध्ये केस, किंवा केसांची बट.
***

शनिवार, ९ मार्च, २०१९

एका कोळियाने - - (पुस्तक परिचय)

लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांचे "The old man and the sea" हे गाजलेले पुस्तक. १९५२ मध्ये प्रकाशित झाले, १९५४ सालचा पुलित्झर पुरस्कारही याला मिळाला. जगातील अनेक भाषांमधे भाषांतरे झाली.
मराठीचे सौभाग्य असे, की मराठीत भाषांतर करण्यासाठी याला लाभले साक्षात् आपले पु. ल.
अगदी छोटेसे पुस्तक आहे. पण हातात घेतले , की संपवल्याशिवाय खाली ठेवलेच जात नाही, इतके जबरदस्त आहे. मूळ पुस्तक, त्याचा विषय, मांडणी आपल्याला खिळवून ठेवतेच, आणि भाषांतरकारालाही जागोजागी दाद देत आपले वाचन चालते.
भाषांतरित पुस्तकाचे नावच "म्हातारा आणि समुद्र" असे सरळ न ठेवता "एका कोळियाने" असे आहे. ही मराठीतली कविता ज्यांना माहित आहे, त्यांना पुस्तक वाचल्यावर पटेल, की याहून समर्पक नाव या कथेसाठी असूच शकत नाही.
क्यूबामधिल समुद्रावर मासेमारी करण्यात आयुष्य गेलेला एक खूप म्हातारा कोळी- सँटियागो, याची ही गोष्ट.
सलग ८४ दिवस समुद्रावर जाऊनही एकही मासा न मिळाल्याने अपयशी असा शिक्का बसलेला तो, त्याच्यावर पूर्ण विश्वास असलेला, त्याची काळजी घेणारा त्याचा मदतनिस एक लहान मुलगा. या मुलाला आई वडिलांच्या सांगण्यामुळे दुसर्या यशस्वी मासेमारांसोबत मनाविरुद्ध जावे लागते.
दुसर्या दिवशी जय्यत तयारीनिशी , आज आपली पनवती संपणारच, या विश्वासाने म्हातारा आपली होडी नेहमीपेक्षा दूरवर, खोल समुद्रात नेतो. आणि तिथे त्याचा सामना होतो मर्लिन माशाशी. म्हातार्यापेक्षा, त्याच्या शक्तीपेक्षा कितीतरी पटीने अजस्त्र असा मासा. यानंतर सुरु होते एक लढाई. म्हातार्याचा आयुष्यभराचा अनुभव, जिद्द, चिवटपणा, आणि माशाचे त्याच्याशी खेळण्यासारखे वागणे.
यात कोण जिंकतो ? कोण जिंकूनही हारतो ?  हे सगळे प्रत्यक्षच वाचण्यासारखे आहे.
समुद्रावरचे जीवन, समुद्राची अनेक रूपे, पक्षी, मासे आणि म्हातार्याचे या सर्वांशी एकरूप असणे फार सुंदर लिहिले आहे.
एक वेळ अशी येते, की तो मासा आणि म्हातारा यांच्यात भावाचे नाते म्हातार्याला वाटू लागते.
हा सगळा भागच इतक्या सहजपणे इतक्या उंचीवर नेला आहे, की वाचता वाचता आपण अवाक् होऊन जातो. जीवनाचे एक गूढ तत्वज्ञान अचानकपणे आणि तितक्याच सहज, सोपेपणाने सामोरे येते.
मूळ पुस्तकातील रेखाटने (sketches) या पुस्तकात जशीच्या तशी घेतली आहेत, आणि ही चित्रे पण पुन्हा पुन्हा पहात रहावी अशी आहेत. (मुखपृष्ठावरुन थोडीशी कल्पना येईल.) हा एक या पुस्तकाचा plus point आहे.
पद्मश्री पु. ल. देशपांडे भाषांतरकाराच्या भूमिकेतही आपली मने जिंकून जातात. नेहमीसारखीच.

गुरुवार, ७ मार्च, २०१९

एक दिवस. . .

अंधाराचे मखमली पांघरूण अलगद दूर करत दिवस नुकताच कूस बदलत होता. एक अलवार निरागस शांतता आसमंतात काठोकाठ भरून राहिली होती. रात्रीच्या वाडग्यात पडलेले नक्षत्रांचे दान कधीचे झिरपून गेले होते.

 एक पक्षी प्रसन्नपणे किलबिललाआणि भाग्यवान ललाटावर नियतीची अक्षरे उमटावीत, तशी एक नवी कोरी ताजी पहाट हळूहळू क्षितिजावर उमटू लागली.

 ***
सकाळ होत गेली. दिवस उगवत गेला. दिवसाचं हे बाळरूप अपार उत्सुकतेने जग जाणून घेऊ लागलं. जिवाशिवाची जोडी होती, तोवर सगळा आनंदच भरून राहिला होता. मग त्याला "मी" आणि बाकीचं सगळं, असं पण कळू लागलं. एक एक नवीन अनुभव पोतडीत जमा होऊ लागला. आता दुःखाचीही अधूनमधून हजेरी लागू लागली.  
सुखदुःखाची आंबटगोड चव घेत दिवस रुळू लागला होता. कसल्याशा लगबगीने उबदार सकाळ पुढे चालू लगली. दुपारची लख्ख उन्हे तिला साद घालीत होती. 
पण सकाळ सरता सरता काही वेगळंच घडू लागलं. काहीतरी भव्यदिव्य करण्यासाठी मन आणि शरीर अधीर होऊ लागलं. बालपणाचं कोवळं बंधन आता रुचेनासं झालं होतं. अन् मग अशातच तारुण्याचा मेघ गर्जत बरसत आला. नवरसांच्या वर्षावाची मग सवय होऊ लागली. तनमन हिरवंगार घेऊनच दिवसाने दुपारच्या दालनात प्रवेश केला. 
***
इथं सूर्य झगमगत होता. अंगात भरपूर जोम होता. कर्तृत्वाला अथांग आकाश मोकळं होतं. उत्साह उतू जाऊ लागला.साथीसोबती मिळू लागले. सप्तरंगी स्वप्नांचा रथ सत्याच्याही मार्गावर विहरू लागला.
 दुपार आणखी थोडी मार्गस्थ झाली, अन् दिवसाला भान आले. डोक्यावरचा सूर्य परिस्थितीचे चटके देऊ लागला. तरीही समोर येणार्या सगळ्या जबाबदार्या, सगळी आव्हाने आपल्या समर्थ खांद्यांवर पेलून घेत त्याचा प्रवास चालूच राहिला. कधी यशाचं दान पडंत गेलं, तर कधी निराशेचं दान अपयशाला द्यावं लागलं. या सगळ्यातूनच कळत नकळत  शाखा विस्तारू लागल्या. फुलू फळू लागल्या. दिवस पिकू लागला.  अधूनमधून घडून गेलेल्या गोष्टी आठवू लागत. दुरावलेल्यांच्या स्मृतींचे सल पुन्हा पुन्हा हलकेच ताजे होत. कशाची समजू नये, पण हुरहुर लागून राही.
एकदा असंच त्याच्या लक्षात आलं, अरे, ही तर सांजेची चाहूल आहे. 
***
मग त्याचं मन सगळा ताळेबंद मांडू लागलं. उत्तर आलं, आता यापुढे खरंखुरं जगायचंय. मग एक एक ओझी हलकेच उतरवायला त्याने सुरुवात केली. प्रखरता गेली, सौम्यपणा आला. कठोरपणा विरघळून मार्दव आले. मन हृदय विशाल होत गेले. मग संध्येचे रंगही तनामनात सामावू लागले. सुखाचे असे अनेक क्षण येत राहिले, जात राहिले. 
आणि मग ती वेळ जवळ आली. 
***
बाहेरचा गलबला केव्हाच बंद झालेला. मनातला कोलाहलही संथपणे थंडावू लागला. आठवणींचे सगळे ठसे अलगद पुसून गेले. पिंडाची पाटी पुन्हा एकदा कोरी झाली. एका अनाहत नादाची अनुभूति आसमंतात पुन्हा एकदा जाणवू लागली. आणि जोडीला तीच लोभसवाणी शांतता. 
मिटल्या डोळ्यांनी त्याने ती शांतता मन भरून ऐकून घेतली, आणि थकला भागला कृतार्थ दिवस त्या अथांग स्थिर गाढ रात्रीच्या कुशीत शिरण्यासाठी सिद्ध झाला.
उद्या पुन्हा नव्याने उगवण्यासाठी.

***